‘गोठ’ या मालिकेत नीलकांती पाटेकर साकारतायत ‘बयो आजी’
ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘गोठ ‘ या नव्या मालिकेत त्या ‘बयो आजी’ ही करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
आजही आपल्या समाजात पुरुषसत्ताक संस्कृती असताना या मालिकेतून ‘स्त्रीचे निर्णय तिच्याच हाती ‘ हा विचार मांडण्यात आला आहे. फिल्मफार्म निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन विघ्नेश कांबळे करत आहेत. कथानकाला असलेली तळकोकणाची पार्श्वभूमी, तिथली संस्कृती, संस्थानिक घराण्यांचा प्रभाव, बदलते कोकणी जनमानस आणि युवापिढी हे या मालिकेचं वेगळेपण ठरणार आहे.
नीलकांती पाटेकर यांनी पूर्वी दोन टीव्ही मालिकांची निर्मिती केली. चित्रपट, रंगभूमीवर काम केलं. मात्र ‘गोठ ‘ ही त्यांची अभिनेत्री म्हणून पहिलीच मालिका आहे. “दर तीन चार महिन्यांनी मला मालिका करण्याबाबत विचारणा व्हायची. मात्र, एकही भूमिका मला पसंत पडली नाही. टीआरपीच्या गणितानुसार व्यक्तिरेखा बदलणं मला पटत नाही. मला रोबोसारखं काम करायचं नव्हतं. त्यामुळे चांगली भूमिका ही माझी मुख्य गरज होती. ‘गोठ ‘ या मालिकेसाठी विचारणा झाली. भूमिका संवेदनशील होती. कथानक समजून घेतल्यावर आणि दिग्दर्शकाशी बोलल्यावर काहीतरी वेगळं करण्याची ही संधी वाटल्यानं ही मालिका स्वीकारली,”असं त्यांनी सांगितलं.
“या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. मालिकेतली प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळ्या पद्धतीनं लिहिली आहे. सिनेमॅटिक पद्धतीनं मालिका होणं हे खूप वेगळं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमला नेमकं काय करायचं हे माहीत आहे. त्यामुळे कथानक खूप वेगळ्या पद्धतीनं समोर येणार आहे. या मालिकेत काम करताना मला वेगळे काम केल्याचे समाधान मिळते आहे. अशी वेगळ्या पद्धतीची मालिका केल्याबद्दल स्टार प्रवाहचं कौतुक करावंसं वाटतं. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्की आवडेल,” असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
FEATURED, GOTH, NEELAKANTI PATEKAR, STAR PRAVAH, मराठी
0 comments:
Post a Comment